*फकिरातील जातीय सलोख्याचे दर्शन*
मराठी साहित्यात अण्णा भाऊ साठे यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या केवळ मराठी कादंबरीची संख्या पस्तीस आहे. ‘फकिरा‘कादंबरीत मानवी कल्याणाचा मूलभूत प्रश्न मांडला आहे. ‘त्यानी परिस्थितीचे दारिद्रय अनुभवले होते. परंतु त्यांच्याकडे वैचारिक दारिद्रय कधीच नव्हते. मनाने श्रीमंत असणाऱ्या अण्णा भाऊंनी समाजातील विविध प्रश्नावर बोट ठेवून परिवर्तनाची दिशा दाखवली आहे. ‘फकिरा’कादंबरीतून एक वैश्विक स्वरूपाचे बंधूभाव अधोरेखित झाला आहे. त्यांच्या एकूण साहित्यास वैचारिक अधिष्टान असल्यानेच या कादंबरीला 1961 मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे.या कादंबरीकडे विविध दृष्टिकोणातून पाहता येते. ग्रामव्यवस्थेतील जातीय सलोखा आणि माणूसकीचे अत्यंत दुर्मिळ दर्शन‘फकिरा’कादंबरीचामुख्य गाभा आहे. माणसाला माणूसपण देवून जाती शिवाय माणूस एकत्र बांधण्याचे सूत्र या कादंबरीत आहे. व्यक्ती, गट, समाज, गाव, यामध्ये जातीय एकोपा निर्माण करणारा धागा कादंबरीच्या कथानकातून गुंफला आहे. या अंगाने गावगाडयातील बंधूत्वाचे चित्रण पहाता येते. अण्णाभाऊंचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्टया कृतिशीलतेवर आधारलेले असल्याने त्यांनी जातीय विषमतेवर सातत्याने बोट ठेवले आहे. फकिरामध्ये जातीयता विसर्जनाचा आदर्श गावगाडाकसा आहे हे पहाता येईल.

तत्कालीन जातीव्यवस्था: (फकिरातील जातीय सलोख्याचे दर्शन)
भारतीय जातीव्यवस्थेत विविध मतभिन्नता आढळून येते. भगवान बुध्दाने सर्वप्रथम या देशात सामाजिक क्रांतीची सुरूवात केली. जाती व्यवस्थेवर त्यांनी प्रहार केला. त्यामुळे उपेक्षितसमाजात हक्काची जाणीव निर्माण होऊ लागली. परंतु पुढे दुर्दैवाने क्रांतीचक्र उलटे फिरले आणि दलित समाजाला आजही उपेक्षितांर्चेी वंचीतांचे जीवन जगावे लागते आहे.भारतीय समाजात विविध जाती, धर्म, पंथ, भाषा आणि संस्कृतीचा समावेश आहे. हिंदू व्यवस्थेचे मुख्य आधार जाती आहेत. खरेतर भारत देश जात व्यवस्थेमध्ये गुंतला गेला आहे. जातीव्यवस्थाहे या देशाचे महत्वाचे वैशिष्टय मानले जाते. सर्व जाती धर्माचे लोक येथे एकत्र गुण्या गोविंदाने राहतात असे अभिमानाने सांगितले जात असले तरी अस्पृश्य, दलित, याना हीनपणाची वागणूक दिल्या जाणाऱ्या या जातीव्यवस्थेला ‘सामाजिक संस्था’ मानतात. खरे तर्री माणूस समजून घेण्यासाठी शिक्षण, त्याचे आचार, विचार समजून घेणे आवश्यक असते. परंतुभारतात जातीवरूनच माणसांचा उलगडा होतो हे स्पष्ट आहे.
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, ”जातिसंस्था मनुच्या फार पूर्वीच अस्तित्वात होती. त्यामुळे जाती संदर्भातील जुनी माहिती वेदातच उपलब्ध होते. यावरून वेदात जाती अस्तित्वात होत्या असे म्हणता येते. “ हा जातिव्यवस्था कायदा मनुस्मृतीतून आपल्या सोयीसाठी आणला आणि अधिक घटट् केला. स्वतःच्या सोयीसाठी इतरांना गुलाम करण्याचा हा नियोजनबध्द कायदा करताना उतरंड निर्माण केली. या उतरंडीत प्रत्येकजण स्वतःचे अस्तित्व शोधू लागले आणि आपल्यापेक्षा अनेकजण खालच्या स्तरावर आहेत हे पाहून समाधान मानू लागले. या जात व्यवस्थेत तळातला, पायातला वर्ग पायातच चिरडला जावू लागला. या कायद्याने सामाजिक बंधने आली, सामाजिक सुरक्षा राहिली नाही. शेकडो वर्षे ज्यांच्यावर अन्याय, अत्याचार झाला अशांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामुळे एक वेगळी दिशा मिळाली आणि माणूस म्हणूनजगण्याचे स्वप्नेवास्तवात येवू लागली. या जाती व्यवस्थेनेच समाजात श्रेष्ठ.कनिष्ठ, उच्च-निच्च, स्पृश्य-अस्पृश्य अशी विषम जातीव्यवस्था निर्माण झाली. या जातीयतेचे चटके हे केवळ भूकेचे नव्हते तर ते वागणूकीचे, अपमानाचे, गुलामीचे होते. या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी समाज परिवर्तनाच्या अनेक चळवळी निर्माण झाल्या .परंतु स्वातंत्र्याच्या 63 वर्षनंतरही जात पुसली जात नाही उलट गट तट वाढत आहेत हे वास्तव मान्य करावे लागते. परंतु अण्णा भाऊ साठे यांनी ‘फकिरा’ कादंबरीच्यारुपाने दलितांना आणि सर्वसामान्यांना उभे करुन त्यांच्यातील धैर्य,शौर्य आणि गुलामिची जाणीव जागृती करुन आदर्श समाजाची निर्मितीचे दर्शन घडवले आहे.
फकिराच्या बंडातील जाती समावेश:(फकिरातील जातीय सलोख्याचे दर्शन)
‘फकिरा’चे बंड हे गावचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी ब्रिटीशांची गुलामी उधळून लावण्यासाठी केलेले बंड होते. या कादंबरीचा काळ हा स्वातंत्र्याच्या लगतचा काळ आहे. दलित चळवळ देशाच्या स्वातंत्र्याबरोबर सामाजिक स्वातंत्र्यासाठिही बंड करत होती. या कादंबरीत दोन पिढयातील इतिहास आहे. कादंबरीला ‘फकिरा’ हे नाव असले तरी ते तर समाजातील सर्व ‘अलुतेदार’ आणि बलुतेदार’ यांनीही केलेले हे बंड आहे. अन्यायाविरूध्द लढणाऱ्या विराला सहकार्य करणारे तत्कालीन सवंगडी, मावळे एकाजीवाने आणि जात, पात विसरून एकाच ध्येयाने प्राण पणाला लावून लढले. फकिराच्याबंडाची ही सर्व कथा वारणेच्या खोऱ्यातील वाटेगाव. शिगाव-काळगाव-भेडसगाव-नेर्ले या परिसरातील आहे.
वाटेगावच्या पाटलाच्या इच्छेखातर आणि गावच्या आनंदासाठी राणेजी मांग एकटा शेजारील गावाशी झुंज देऊन जोगण्या आणतो. परंतु शेवटी जोगण्या आपल्या हाद्दीत आणल्यानंतर खोताडून तो अन्यायाने मारला जातो.काही काळाने राणोजीने आणलेल्या जोगणी परत नेण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळी मोठा झालेला फकिरा शर्थीने लढतो आणि जोगणी गावाबाहेर जावू देत नाही. गावात एकीकडे तापीच्या साथीचा आजार तर दुसऱ्या बाजूला दुष्काळ पडतो. यावेळी समाजाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. तेव्हा फकिरा धान्य लुटून आणतो. याचा परिणाम म्हणून संपूर्ण गावाला दिवसातून तीन वेळा हजेरी देण्याची सक्ती केली जाते. आपण काहिही न करता आपल्यावर अन्याय का? असा प्रश्न फकिराला पडतो. त्याला माणसाला माणूस म्हणून जगू न देणाऱ्या सरकारचा राग येतो. याच काळात फकिरा आणि त्याचे सहकारी भेडसगाव येथील सरकारी खजिना लुटतात. असे कृत्य केल्याने फकिराला पकडण्याचे फर्मान काढूनही फकिरा कोणाच्या हाती लागत नाही. त्यामुळे गावातील सर्व महार, मांग समाजाला सरकारी छावणीत बांधून ठेवले जाते. त्यांच्या सुटकेसाठी या छावणीवर फकिरा साथीदाराच्या मदतीने हल्याच्या तयारी करतो. परंतु हल्ला अपयशी ठरतो. शेवटी उपासमारीने मरणाऱ्या आपल्या समाजाचीझालेली दशा फकिराला बघवत नाही.आपल्यासाठी समाजातील लहान थोरांना टाचा घासून मरेल असे वाटल्याने फकिरा साहेबासमोर स्वतः हजर होतो आणि समाजाला मुक्त करतो. डॉ.शरद गायकवाड म्हणतात, ‘‘मन, मेंदू आणि मनगट बळकट ठेवून पेन ब्रेनचा वापर जाती अंताच्या लढयासाठी करून समताधिष्ठित समाज निर्मितीच्या ध्यासाने प्रवृत्त होऊन अण्णाभाऊंनी जगातल्या तमाम शोषिर्ती उपेक्षिर्ती वंचिर्ती श्रमिकांचे दुःख जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी साहित्यनिर्मिती केली.’’2 डॉ.शरद गायकवाड यांच्या या विधानातून समाजातील प्रश्न मांडण्यासाठी अण्णा भाऊंनी समाजातल्या प्रत्येक माणसात परिवर्तनासाठी एकपोलादी पुरूष तयार केला जे मनाने आणि धडाने मजबूत होते. या समाजाला अन्यातून आणि उपासमारीतून बाहेर काढण्यासाठी फकिराच्या अनेक सहकाÚयानी बंड केले आहे. कादंबरीतील मुख्य पात्र ‘फकिरा’ असला तरी फकिराच्या बंडामध्ये अनेक जातीचां समावेश होता.
फकिराच्या या बंडात रोणोजी मांग या निर्भीड आणि उमद्या मातंग तरूणाची ओळख होते. त्यांच्या सांस्कृतिक लढयानेच खऱ्या अर्थाने फकिराच्या बंडाची सुरूवात होते. फकिराच्या बंडात शंकरराव पाटील हे सवर्ण जातीतील व्यक्तिरेखा आहे. राणोजीच्या हत्येप्रसंगी त्वेषाने पाटील म्हणतात,‘‘मी शिगाव बेचिराख करीन,नाहीतर वाटेगावला आग लावून मीही जळून मरेन.’’(फकिरा,पृ.14) या शब्दात आपला राग व्यक्त करतात. दलित समाजाच्या पाठीमागे उभे असणारेशंकरराव पाटील हे मराठा जातीचे खंबीर असे नेतृत्व आहे. जात पात न पहाता राणोजीच्या हत्येचा सूड घेण्याची भाषा करतात.विष्णूपंत कुलकर्णी हे ब्राह्मण समाजातील पुरोगामी विचाराची व्यक्तिरेखा आहे. फकिराच्या गोतावळयात जीवाला जीव देणारा बळी, मुरारी, फकिराचा भाऊ साधू,भिवा, सावा, चिंचणीकर, पिराजी ही झंजावतासारखी माणसे होती. सत्तू हा फकिराचा अत्यंत जवळचा आणि कधीही हाकेला ओ देणारा मित्र होता. दौलती मांग, आप्पा मांग, सावळा, बळी, आप्पा, सहदेव इत्यादी अफाट बळ आणि जिद्द असणाऱ्या मातंग जातीतील व्यक्तिंचा समावेश फकिराच्या बंडामध्ये होता.मातंग समाज पोटासाठी भीक मागण्यापेक्षा प्रसंगी उपाशी राहतो हे या व्यक्ती विशेषत्वाने व्यक्त होतात. रामोशी समाजाचा भैरू या बंडात जात पाहून नाही तर गावचे हित पाहूनसामील होतो. तो म्हणतो, ‘‘एका शिराची किंमत मी पन्नास शिरं घेणार’’(पृ.14) राणोजीच्या हत्येने भैरूरामोशी जातीयवृत्तीने या बंडात सामील होतो. गज्या सुतार, दादा पाटील, मारूती चव्हाण, तायनु महार, दुलाजी ढेकणा, नाना डोंगरा, पांडू नांगरा इत्यादी विविध जातींचा या बंडात समावेश होता.
या लढयात ‘फकिराला जपा वाघ व्हईल’ असे दुसऱ्या जाती व मुलाबद्दल कौतुक वाटणारा चंदु आत्तार आहे. गावातील मुलं चपळ, धीट, भक्कम, धैर्यशील असूनही वावगे असे काही करण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. सावळा मांग यांच्यावर अमंलदार बारीक लक्ष ठेऊन असे. कितीही बलवान असले तरी मोठयांचा आदर राखणे हा त्याचा स्वभाव होता. प्रसंगी रागाने बोलले तरी मनात अढी नसे. थोरांमोठयांबद्दल आदर असणारा मांगेत्तर समाजही एकजीवाने राहतो. सावळयास चोरीच्या संशयाने प्रांतानी बोलावले तेव्हा, ‘‘मांग कधीच कुनाची खून करीत न्हाय!कनसं खुडून प्वाट भरतं,तसं मुंडकं मारुन भरत नाही.’’(फकिरा,पृ.39) असं सावळा प्राताला उत्तर देतो. मातंग समाज कुठेही कचरत नाही. हा समाज कोणालाही उगीच भीती घातल नाही आणि उगीच कोणाची गुलामी करत नाही. दलित संवर्गातील मुलांना गावातील कोणत्याही व्यक्तीने दटावल्यास मुलांना राग येत नसे. मुलांची समजूत काढणे, कौतुक करणे, स्पष्ट बोलणे असा प्रकारचा गावगाडयातील सर्वसामान्य लोकांचा मोकळा स्वभाव होता.
अशा प्रकारे फकिराच्या बंडात ब्राह्मण, मराठा, मांग, महार, रामोशी, आत्तार, सुतार, माळी इत्यादी जातीचा समावेश होता. ही माणसं बळानं, शरीरानं, हिमतीनं भक्कम होती, पाटील, पंत ही कर्ती माणसं गावात ढाण्या वाघासारखे वावरत होते. यातील व्यक्तिरेखा स्वाभीमानी आहेत. या माणसांविषयी प्र.के.अत्रे म्हणतात, ‘‘ती कच खाणारी, हार मानणारी माणसं नाहीत. वार झेलायला त्यांची छाती नेहमीच ताठयाने उभारलेली आहे. धडक द्यायलामस्तक नेहमीच पुढे उगारलेले आहे.’’3 आपल्या हक्कासाठी आणि सामान्य गरिब समाजावर अन्याय होऊ नये यासाठी प्रसंगी मृत्यूला न भिणारा हा अठरापगड जातीचा समाज फकिराच्या बंडात एकमुखाने लढले होते. अण्णा भाऊच्या विचारांची झालर या कादंबरीतून सातत्याने चमकताना दिसते. आाजच्या गावगाडयातही स्वतःच्या जातीपुरते पाहणारा कुणबी, मराठा, ब्राह्मण,दलित आपापले वर्चस्व सिध्द करताना आढळतात. हा विरोधाभास फकिरामध्ये दिसून येतो. फकिरा आणि ’फकिरा‘तील अठरापगड जातीच्या एकजूटीला आणि यातील प्रत्येक व्यक्तिरेखेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. आजही भारतीय समाजाच्या परिवर्तनासाठी खेडयातून सुरूवात झाली पाहिजे. कारण भारत देश हा खेडयांचा देश आहे. खेडी सुधारली तर देश सुधारेल.गावगाडयामध्ये प्रचलित असणारी जातीयता नष्ट झाली तरच देश गुण्यागोविंदाने नांदेल. ही पार्श्वभूमी हा विचार अण्णा भाऊंच्या कल्पनेतील आहे.
फकिराच्या बंडातील मांगेतर व्यक्तिरेखा:(फकिरातील जातीय सलोख्याचे दर्शन)
फकिराच्या बंडात केवळ दलित व्यक्तिरेखांचा समावेश नव्हता. सर्वच जातीधर्मातील लोकांनी प्रत्येकाला आधार,देत.घेत हे बंड केले. ’शंकरराव पाटील’ ही या कादंबरीतील सवर्ण समाजाची व्यक्तिरेखा आहे. या व्यक्तिरेखेच्या मनामध्ये जी भावना आहे ती अशी की, गावात यात्रा भरावी लोक आनंदाने रहावेत. अस्पृश्यता पाळल्या जाणाऱ्या या देशात स्वातंत्र्यपूर्वकाळात पाटलानी दलितांची वैयक्तिक चैकशी करणे, त्यांची विचारपूस करणे, पानखाण्यास देणे, अशा गोष्टी दलितांच्यासाठी खूप मोठी,अभिमानाची असे. या काळातही वाटेगावातील शंकररावपाटील यांच्या ठिकाणी मानवतावादी दृष्टिकोण होताय कोणताही दुजाभाव नव्हता. पाटलांच्या एकूण वर्तणुकीतून लोक त्यांना गावचे दैवत मानत. सर्वसामान्यांच्या मदतीला सातत्याने धावून येण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते गावाचे भूषण आहेत अशी भावना निर्माण होते. फकिरा गावासाठी समाजासाठी आणि पाटलांची मर्जी सांभाळणासाठी अनेक गोष्टी करतो. पंत आणि पाटलांच्याविषयी अभिमान असणारा राणोजी म्हणतो,‘‘पंतावानी आणि तुमच्यावानी माणसं वाघाला दावं लावतील की.’’(पृ.3) या दोघांच्याकडून राणोजीला एक प्रकारचे बळ मिळे. राणोजीच्या मृत्यूनंतर शंकरराव पाटील राधाला आपल्या मुलीसारखी वागणूक देतात व तिला बाहेर कामाला न जाण्याची ताकीद देतात. हवं तेवढं धान्य घेण्यास सांगतो. आपल्या शब्दांमुळेच राणूजी गेला याचे शल्य वाटते.शंकरराव पाटील दौलतीच्या कुटुंबाला मदत करतात. आपली जबाबदारी स्वीकारून पाटील स्वतःच्या घराप्रमाणे दौलतीच्या कुटुंबाची काळजी घेतात. दौलतीच्या घरासमोरपाटीलधान्याचीगाडी आणूनउभी करतात. शंकर पाटील कतृत्वान, दयाळू, दिलदार, दानशूर अशी ही व्यक्तिरेखा आहे. योग्य निर्णय क्षमता आणि माणसाला उभारी देणारा माणूस म्हणून त्यांची ओळख होते.
विष्णुपंत कुलकर्णी:‘फकिरा’तील अतिशय विचारी आणि संयमी व्यक्तिरेखा म्हणून विष्णुपंत कुलकर्णी यांचा उल्लेख करावा लागतो. साऱ्या गावाचा विचार करणारी ही व्यक्ती आहे. ते ब्राह्मण जातीचेअसूनही ब्राह्मणाची जातीय संकल्पनापुसून काढणारी गावगाडयातील महत्वाची व्यक्तिरेखाआहे. विष्णुपंताना गावचा कैवारी म्हणून गाव ओळखतो. गावातील सर्व महार, मांग समाजाच्या पाठीमागे नेहमी धैर्याने आणि संयमीवृत्तीने उभे राहणारी ही व्यक्तिरेखा आहे. पंत आणि पाटील यांच्या वैचारिक आधाराने गावगाडा चालतो. जीव गेला तरी चाकोरी न सोडणारा विष्णुपंत कुलकर्णी यांचे व्यक्तिमत्व आहे. बापू खोत, राणूचे शीर कापून घेऊन जातो. तेव्हा इर्षेला पेटलेल्या लोकांना शांत करत पंत त्यांना समजवतात. रात्री परक्या गावात शिरणं चूक होईल. राणूचे शीर रात्री घेऊन येणे हे उचित नसल्याचे पंत सांगतात. यावरून पंताचे नैतीक आणि वैचारिक धारणा लक्षात येतात. पंत गावची जबाबदारी आणि खबरदारीकुटुंबासारखी घेतात. नियमाने चालणारे हे व्यक्तिमत्व कोणावरचाही अन्याय सहन करत नाही. एक सकारात्म व्यक्तिरेखा म्हणून ही त्यांच्याकडे पाहता येते. ते अत्यंत काटेकोर वृत्तीचा माणूस आहे. त्यामुळे प्रांत सुध्दा त्यांच्याशी जपून बोलतो. अन्याय झालेल्या व्यक्तिला न्याय मिळवून देणारी सनदशीर व्यक्तिरेखा म्हणून त्यांची ओळख पटते. पंत दलित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. सावळयासाठी ते प्रांतापर्यंत जातात. त्यांनी वैचारीक लढाई जिंकली आणि सावळयाची हद्दपारीची शिक्षा रद्द होते. अशा प्रकारे गावातील या दोन व्यक्तिरेखा सामान्य माणसाला माणूसपणदेतात. त्यांच्या प्रश्नासाठी आणि न्यायासाठी कसे पाठीशी राहतात. सुख दुःखाच्या प्रसंगी मदत करतात त्यांना आधार देतात अशा प्रकारचे हे नाते इतरांना सामाजिक बंधूतेची शिकवण देणारे असल्याने या दोन व्यक्तिरेखा गावचे भूषण ठरतात.
याशिवाय भैरू रामोशी, दुलाजी ढेकणा, दिनू गुरव, रंगा सुतार, गलू माळी, दुलारी वाघमारे, सत्तू, गणू रामोशी इत्यादी मांगेत्तर योध्दे या परिवर्तनाच्या बंडात सहभागी होते. हे बंड सर्व जातीधर्माचे होते. हे बंड अन्यायाविरूध्द, समतेसाठी आणि पोटाच्या प्रश्नावरून निर्माण झालेले आणि समतेची मागणी करणारे होते. गुलाम राहून आयुष्य घालवण्यापेक्षा लढून मेलेल बरे असे अनेकांना वाटते. प्रत्येकाला वाघासारखे निर्भीड जगता आले पाहिजे अशा परिवर्तनाचा सुर दिसून येतो. या बंडातील सर्वचजण आपल्या कुटुंबातील लोकांच्या उपासमारी पाहून मोठया धैर्याने लढतात. हे बंड केवळ फकिराचे नाही तर सर्व समाजातीचे होते. या बंडात अनेकांचा प्रत्यक्ष सहभाग होता. एकूणच काय तर मानव जातीला सर्व प्रकारच्या विनाशापासून सावध करत माक्र्स आणि आंबेडकर यांच्या मार्गावरून गेले पाहिजे, असा संदेश अण्णा भाऊंचे साहित्यातून मिळतो.
सलोख्याची चिंतन:(फकिरातील जातीय सलोख्याचे दर्शन)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला केंद्र माणून त्यांच्या कल्याणचा विचार केला व प्रत्येक माणसाच्या स्वातंत्र्याला प्राधान्य दिले. याच विचारानी भारावलेले अण्णा भाऊंनी तळच्या थरातील माणसाला गुलामीतून मुक्त करण्याचा वसा घेतला. याची प्रचीती त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्यातील व्यक्तिरेखा परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करतात यातून त्याचे दर्शन घडते.अण्णा भाऊंच्या लेखनाचा गाभा माणूस असल्याने ते जात, धर्म, पंत यांच्या पुढचा विचार करतात. अण्णा भाऊंची लेखणी पीडित, वंचित, दलित, शोषित, कामगार, मजूर, या सर्वांसाठी परिवर्तनाचे रणशिंग फुंकते. हा प्रश्न देशातील बहुजनांचाअसल्याने अनेक तरूण जात-पात विसरून या बंडात उतरतात. यामध्ये सांस्कृतीक, आर्थिक बंड तर आहेच याशिवाय गावपातळीवरील स्वातंत्र्य, समता, बंधुता याचे प्रतीक म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा ठरतो. ‘ फकिरा आणि त्याचे साथीदार सामान्य माणसाला मुक्त करण्याचा वसा घेतात व धाडसाने आणि कृतीने त्यांच्या प्रश्नासाठी झगडत राहतो. जातीयतेच्या पिढयांन पिढया चालत आलेल्या उतरंडीतून विभागलेल्या समाजात सामाजिक सलोखा राखण्यासाठी जिवाची बाजी लावणारे फकिरा विष्णुपंत कुलकर्णी, शंकर पाटील, राणोजी मांग या व्यक्तिरेखा सामाजिक जबाबदारीतून सर्वच घटना प्रसंगाकडे पाहतात. या सर्वांना सन्मानाने जगण्याची आस आहे.
फकिरातून आपणास जागोजागी जातीय सलोख्याचे दर्शन घडते. जोगण्या आणतेवेळीरोणोजी मांग मारला जातो आणि त्याचं शिर कापून खोत घेऊन जातो. या घटनेनेतर जात-पात विसरून कैकजण म्हणत होते ‘‘रोणोजीचं शिर घेऊन येऊ किंवा आपलं शिर देऊ’’ (पृ.16) असे त्वेषाने बोलू लागले. त्यांना गावासाठी शिर दिलं म्हणून गाव त्याच्यासाठी शिर द्यायला सज्ज होतो. यातून गावचा एकोपा लक्षात येतो. राणोजीने आत्मसमर्पण केल्याने लोक राणोजीच्या कौतुका बरोबरच हळहळ व्यक्त करतात. घडल्या घटनेचे सांत्वन करण्यासाठी विष्णुपंत कुलकर्णी मांग वाडयात जावून दौलतीला धीर देताना म्हणतात. ‘‘नाना, रडायचं नाही हा राणेजी जिवंत आहे, असं समजून चला,’’ (पृ.18) दौलतीला आधार देतात आणि राणोजीच्या दोन पोरांना सर्वजन मिळून जगवू, जपू असे वचन देतात. राणोजीचे वाटेगावर असणारे अनंत उपकार पंत, पाटील आणि गावकरी विसरत नाहीत. अशा ओढवलेल्या दुखःच्या प्रसंगी धीर देणे, त्याच्या कुटूंबाची जबाबदारी स्वीकारणे यातून विष्णुपंत कुलकर्णी यांच्या सामाजिक बांधिलकी व आदर्शवत कतृत्वाचा सर्वानाच अभिमान वाटतो. पंत जोगणीचा मालकी हक्क राहीबाई व राधा यांचा असल्याचे सांगून पुजेचा मान त्यांना देतात. यातून स्त्रीयांनाही सन्मानाची वागणूक देणारे पंतस्त्रीयांचा सन्मान राखतात याचेही दर्शन घडते. रूढी परंपरेबरोबरच सर्वांनी एकोप्याने राहणे, माणूस म्हणून माणसाचा विचार करणे, जातीपेक्षा माणसाला आणि माणसाच्या मनाला प्राधान्य देणे ही भूमिका गावचे पाटील आणि पंत यांची राहिलेली आहे. यावरून गावात केवळ लोक असून चालत नाही तर ही व्यवस्था पुढे चालवण्यासाठी आधार, धीर, विचार, चांगल्या वाईटाची जाणीव करून देणारे पंत आणि पाटील यासारखे समाजहित जोपासणारे पुढारी असेल तरच खऱ्या अर्थाने सामाजिक एकोपा टिकून राहतो. राणोजी नंतर दौलतीनानाला गावकऱ्यानी काहीच कमी पडू दिले नाही. परंतु केवळ स्वतःचा विचार करणे दौलतीला पटत नाही. माझ्या गावातील इतर माणसानी काय खावावे, कसे जगावे हा प्रश्न नानाला सातत्याने भेडसावतो. डॉ.गिरीश मोरे म्हणतात,” जगणे हा आपला हक्क परंतु माझ्यासहित इतरांना जगता आले पाहिजे ही दृष्टी फकिरामध्ये दिसते.”4 दुसऱ्याचा विचार करणारा गावातील प्रत्येकाच्या वृत्तीमुळेच जिव्हार् जातीय सलोखा निमार्ण होतो . प्रत्येकाच्या जीवनातील अडी-अडचणीत मदत करणे, घासातला घास काढून देणे, प्रसंगी अर्धपोटी रहाणे, संकटकाळात एकमेकांना आधार देणे असे प्रेमच जातीपेक्षा माणसाचे मूल्यवाढवते.समाजात माणूसकी टिकण्यासाठी केवळ आर्थिक नाही तर मानसिक भावनेने विचार करणारे आशावादी लोकच आदर्श जातिविरहीत गाव निर्माण करु शकतात असे मला वाटते. जोगिणी परत आणताच शंकरराव पाटील फकिराला मिठी मारतात आणि फकिरा दिसताच विष्णूपंत फकिरासाठी घोडा थांबवत त्याची चैकशी करतात. या दोन प्रसंगातून जात बाहेर ठेवून माणूस म्हणून लहान मोठया भावाप्रमाणे सन्मानाने, एका विचाराने एकोप्यानेच राहतात. असे एकोप्याने,एकजूटीने राहिले तरच परिवर्तन अटळ असते असे म्हणत येते.
फकिरातील जातीय सलोख्याचे दर्शन
गुन्हेगारीचा कोणताही पुरावा नसताना सरकारने सावळाला गुन्हेगार ठरवलं याचा जाब विचारण्यासाठी फकिरा पंताकडे जातो. सावळाला चोरीच्या संशयावरून सरकार हद्दपार करते तेव्हा पंत सावळाच्या मागे सावलीसारखे उभे राहतात. जातीनिशी पंत सावळाच्या संदर्भात साहेबाकडे जातात आणि सावळाची सुटका करतात. सावळाला पंतामुळे नवीन आयुष्य मिळाल्यामुळे तोत्यांना दंडवत घालतो आणि आयुष्यभर पंतांच्या पाठीशी उभा राहतो. सुरूवातीस पंत सावळासाठी पाठीराखा होतात तर सुटकेनंतर सावळा आपल्या सर्व शक्तीनिशी पंतांच्या मागे उभा राहतो. हा जातीय सलोखा लक्षात घेण्यासारखा आहे.सावळाला दरोडेखोर ही ओळख पुसायची आहे. त्यामुळे हद्दपारीच्या शिक्षेतून बाहेर पडल्यानंतर मांग समाजाबरोबरच गावालाही बरे वाटते. स्वतःच्या गावाबद्दल, समाजाबद्दल, वरिष्ठाबद्दल आदर, विश्वास, आपुलकी याचे दर्शन घडते. फकिरा कृतीतून बोलणारी व्यक्तिरेखा आहे.
परिवर्तनाच्या बंडातील आपल्या सहकार्याबद्दल गौरव उद्गार काढताना फकिरा म्हणतो, ‘‘माझी माणसं नुसती चिऱ्यासारखी हायती. जिथं बसवलं, तिथं बसनारी.’’(पृ,.62) या बंडासाठी अष्टपैलू अशा व्यक्ती होत्या.फकिराचे सहकारी एका जातीतील नव्हते सर्वच अलुतेदार आणि बलुतेदारासह सर्वसामान्य माणूस जीवावर उदार होवूनच लढतात. ‘सत्तू’ हा अठरा वर्षे इंग्रज सरकारविरूध्द लढणारा क्रांतीकारी होता. अन्यायाविरूध्ध्द लढणारा सत्तू स्वाभिमानी आणि नेक काम करणारी व्यक्तिरेखा आहे. चैगुल्याचा मार खाणाऱ्या महारणीला तो वाचवतो आणि त्रास देणाऱ्या चैगुल्या सारखा वाहयात ताठ माणसाची हत्या करतो. सत्तूच्या धास्तीने अनेकांचे संसार मार्गी लावले. तो वारणेच्या खोऱ्यात राहून सावकरकी संपपवण्याचा प्रयत्न केला. सत्तू त्यांचा देव बनला. स्वाभीमानी मनाचा मराठमोळा शूर क्रांतीकारी होता. तो लोकांच्या गळयातील ताईत बनतो. सत्तू मानवी मूल्य सांगतो. तो म्हणतो मी या जगात सर्वश्रेष्ठ फक्त इमानच आहे नि इमानाचे मोल कुणीही करू नये, कुणीही इमान विकू नये असे सत्तूचे मत होते. त्याप्रमाणे त्याची दृष्टी आणि कृती होती. स्त्रीया त्याला भावाची उपमा देतात आणि जात्यावर दळताना गीतातून सत्याला आयुष्य मागतात. असे चांगलं काम करणारा सत्तू सर्वांचा आधार बनतो. सत्तूला गावगाडयातील óिया पाठच्या भावासारखा समजतात हे ऐकून आणि प्रत्यक्ष पाहून त्याला खूप जिव्हाळयाची नाती मिळाल्याचे समाधान वाटते.
शंकरराव पाटील आपल्या गावात जोगीणीची यात्रा नाही, उत्सव नाही त्यामुळे जगण्यातच काही रस नसल्याचे राणोजीला बोलून दाखवताच, राणोजी आपल्या गावासाठी जोगण्या आणण्याचा एकमुखी निर्णय घेतो. ‘राणोजी’ आणि पाटील हे दाघेही स्वतःचा विचार नकरता आपल्या गावच्या सुखाचा आणि सर्व जनतेच्या आनंदा, उत्साहाचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचाही विचार करतात. सत्तूला फकिरा मदत करतो. तेव्हा‘फकिरा‘ या मित्रा विषयी कृतज्ञताव्यक्त करतो.या परिवर्तनाच्या क्रांतीमध्ये सत्तू .फकिरामैत्रीचे नाते अधिक दृढ होते. यातून जात पात न पाहता सर्वांच्या कल्याणचा विचार करणारा सत्ता सामाजिक परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो. सर्वांच्या कल्याणाचा आणि माणूसकीचा विचार करतो. फकिराची आई राधाबाई सगळयांच्या बरोबर मिळेल ते खाऊ किंवा सगळयांच्या बरोबर उपाशी मरू असा विचार करते. यावरून सामान्यमाणूसच माणूसकी जपण्याचा अधिक प्रयत्न करतो. अन्नान करून मरणाऱ्या समाजाला फकिरा धीर देतो आणि माळवाडीच्या मटकरीला लुटून सर्वांना जगविण्याचा प्रयत्न करतो. गुन्हेगारी समजून सर्वांना अटक करतेवेळी विष्णुपंत या क्षणी माझ्याही घरी भाकरी मिळेल. मग मी पण चोरी केली कारअसा सवाल करून सर्वांना वाचवतो. याप्रसंगी शंकरराव पाटील“माणूस असावा तर पंतासारखा असावा”(पृ,.96) असे पंताबद्ल कौतुक वाटते. गावातील पाटील आणि पंत या दोन माणसांमध्येचएकोप्याचे, सच्चा जिवाभावाचे सलोख्याचे,नाते होते.
भेडसगावचा खजिना लुटल्यानंतर मिळालेल्या पन्नास हजार रूपये ही सर्व रक्कम वाटून देण्याची सूचनाफकिरा करतो. वाटण्यापूर्वी आपल्या गावच्या गोरगरिबांना मदत म्हणून दोन भाग काढून तो एक मांगवाडयात व दुसरा महारवाडयात देण्याचे ठरवून उरलेली रक्कम सारखी वाटून घेतात यातून सुध्दा जातीय सलोखा आढळतो. केवळ दलित समाज नव्हे तर बापू खोताने त्याची मुलगी शंकराव पाटलाच्या भावकीत देतो. यावरून एक वेगळा जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न खोत करतो.
पंत, पाटील, सवर्ण आणि दलित सर्व एकाच आईची लेकरे असल्यासारखी वागतात. अशा प्रकारची विशाल मने, आपुलकी, जिव्हाळा आणि सामाजिक बंधूत्व पहावयास मिळते. ‘फकीरा’ मधील व्यक्तिरेखा या ‘एक जीव, एक संघ’ अशा व्यक्तिरेखा आहे. कोणावरही अन्याय होणार नाही अशा पध्दतीचं त्याचे विचार आणि वर्तन आहे. नव्या पिढीला ‘फकिरा’तील व्यक्तिरेखा, त्यांच्यातील जातीय सलोखा,लोकल्याणाचा आणि माणूसकीचा विचार नक्कीच दिशादर्शक ठरेल.
समारोप:(फकिरातील जातीय सलोख्याचे दर्शन)
‘फकिरा’कादंबरीतील जातीय सलोखा या दृष्टिकोणातून पाहिल्यानंतर असे निदर्शनास येते की,जातीय सलोखा अबाधीत राखण्यासाठी विशाल मने, आपुलकी, जिव्हाळा आणि सामाजिक बंधूत्व आवश्यक असते त्याचे दर्शन या कादंबरीतून घडते. फकिरा आणि त्याचे साथीदार सामान्य माणसाला मुक्त करण्याचा वसा घेणे, विष्णुपंत कुलकर्णी मांग वाडयात जावून दौलतीला धीर देणे, राणोजीच्या दोन पोरांनाजपण्याची,जगविण्याची जबाबदारी स्विकारणे,स्त्रीयांना सन्मानाची वागणूक देणे,पंतानी सावळास आधार देणे,शंकरराव पाटील यांच्या ठिकाणी असणारा विश्वास,आपुलकी या भावना कृतीतून आपणास जागोजागी जातीय सलोख्याचे दर्शन घडतात. ग्रामव्यवथेतील जातीय सलोखा पाहता गावगाडयाची, समुहभावना, संघ भावनासमाजातील तळागळातून वृध्दींगत व्हावी असाविचार या कादंबरीतून अधोरेखीत झाला आहे. अशा विचारानी समतेच्या,एकोप्याच्या,बंधुत्वाच्या,जातीय सलोख्याच्या भावना अधिक बळकट झाल्या आहेत. ’फकिरा’कादंबरीतील लोक जात.पात विसरुन बंधुत्वाने राहतात ही जाती अंताची पहिली पायरी आहे असे मला वाटते. गावातील एकीच्या बळाने सामान्य माणसाला, असामान्य व्यक्तिमत्व प्राप्त झाला आहे. एकुणच या कादंबरीतून माणूस नी माणूस ,गावंच्या गावं, एकत्र जोडला गेला पाहिजे, बांधला गेला पाहिजे असा राष्ट्रीयविचार वृध्दिगंत झाला आहे.
विष्णुपंत कुलकर्णी म्हणतो, ‘‘ही पांढर सर्वाचींच हाय सगळयांनी गुण्यागोविंदाने रहायला पाहिजे’’ या भूमीवर दलित, मराठी, ब्राह्मण, या सर्वाचा तेवढाच हक्क आणि अधिकार असल्याचे सांगतात यावरुन समाजातील एकोप्याचे दर्शन घडते. कादंबरीचा मुख्य गाभालोकशाहीचे समतावादी तत्व, जातीयसलोखा अबाधीत रहावा हा आहे. ज्यांच्यावर अनेक वर्षे अन्याय झाला अशा अठरापगड जातीना एकत्र बांधून स्वातंत्र्य,समता,बंधूता ही मूल्ये रुजविण्यासाठी झटतो असे वाटते. गावगाडयातील समाज एकोप्याने, समतेने राहिला पाहिजे. जाती जातीमध्ये विखूरलेला समाज एकजुटीने आणि ऐक्याने राहिला पाहिजे.सामान्य माणसाला स्वतंत्र्यपणे जगता आले पाहिजे. असा वैश्विक स्वरूपाची सामाजिक एकता, बंधूभाव वृध्दिंगत करणाऱ्या फकिराच्या धडपडीतून जातीय सलोख्याचे दर्शन घडते.
संदर्भ:
- डॉ.सुमंत यशवंत, डॉ.पुंडे द.दि:संपा.‘महाराष्ट्रातील जाती संस्था विषय विचार ‘पृ.क्र.267’
- डॉ.गायकवाड शरद :संपा.जोखे विजयकुमार ‘अण्णा भाऊ साठे चरित्र आणि कार्य ‘पृ.77
- अत्रे प्र.के : ‘जननायक अण्णा भाऊ साठे‘ ,संपा. डॉ.शिवाजी जवळेकर, कला अकादमी व
संशोधन केंद्र, लातूर, 2007 पृ.17
4.मोरे गिरीश:‘परिवर्तनाचा जागर‘, निर्मिती संवाद प्रकाशन,कोल्हापूर,प्रथम आवृती,2013,पृ.17
लेखक,
डॉ प्रकाश हुलेनवर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा